तुळजापूर जुन्या बसस्थानकावर धाडसी चोरी; ६० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र चोरताना महिला रंगेहात पकडली!
तुळजापूर प्रतिनिधी :-महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या पावन नगरीत तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला चोराला रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल बापु आगाव (वय ६० वर्षे, रा. सत्यवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) या दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात थांबल्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन आरोपी महिला यमुनाबाई सुनील भोसले (वय ३५ वर्षे, रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हिने मंगल आगाव यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (किंमत अंदाजे ३०,००० रुपये) चोरले.
मंगळसूत्र चोरून पळून जात असतानाच संशयित महिला यमुनाबाई भोसले हिला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर फिर्यादी मंगल आगाव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.
पोलीस आवाहन बसस्थानक, मंदिर परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. या घटनेवरून असे लक्षात येते की महिला चोरांची संख्या वाढत आहे .कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. सर्व प्रवाशांनी सावधान आणि सजग राहावे. खास करून महिलांनी अनमोल दागिने प्रवासादरम्यान झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.






