Best News Portal Development Company In India

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दणकेबाज कामगिरी, ३२ घरफोड्या करणारा अट्टल चोरटे गजाआड, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दणकेबाज कामगिरी, ३२ घरफोड्या करणारा अट्टल चोरटे गजाआड, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
​तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुख्य आरोपीला शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत.
​दिनांक ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद ईज्जपवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांत हवा असलेला अट्टल गुन्हेगार अजय श्रावन शिंदे हा सुंभा येथे आला आहे. माहिती मिळताच त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न; फिल्मी स्टाईलने पकडले.
​पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि त्यांच्या पथकाने सुंभा परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून अजय श्रावन शिंदे आणि त्याचा साथीदार श्रावन जमनाशा शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.
​पोलिसी खाक्या दाखवताच ३२ गुन्ह्यांची कबुली!
​सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अजय शिंदे याला अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल ३२ घरफोड्या केल्याचे कबूल केले. यामध्ये खालील पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण , शिराढोण , मुरुम, लोहारा, वाशी, परंडा , येरमाळा, आनंदनगर,
चोरीच्या पैशातून घेतली ‘ब्रेझा’ अन् ‘बुलेट’!
पोलिसांनी आरोपींकडून त्यांच्या वाट्याला आलेले १८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचे काही सोने विकून आलेल्या पैशांमधून आरोपीने स्वतःच्या चैनीसाठी एक ब्रेझा चारचाकी गाडी आणि एक नवीन बुलेट दुचाकी खरेदी केली होती. पोलिसांनी दागिने आणि वाहनांसह एकूण ४५,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, श्री. अमोल मोरे तसेच पोलीस कर्मचारी विनोद जानराव, शौकत पठाण, दयानंद गादेकर, नितीन जाधवर, बळीराम शिंदे, जावेद काझी, प्रकाश औताडे, समाधान वाघमारे, बबन जाधवर, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, राहुल नाईकवाडी, अमोल निंबाळकर, राठोड, प्रदीप वाघमारे, पुष्कर मुंगळे, शोभा बांगर, सुभाष चौरे, महेबुब अरब, विनायक दहिहंडे, प्रकाश बोईनवाड, दिपक डोंगरे, बाबा गुरव आणि रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
सदरील कामगिरीमुळे जिल्ह्यातील भुरट्या चोरांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या ह्या कारवाईने पोलिसांकडून आशा-अपेक्षा वाढल्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india