वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
वंचित बहुजन आघाडीचे उमरगा तालुका अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, २२ मे रोजी सायंकाळी उमरगा येथील पक्ष कार्यालयात रामभाऊ गायकवाड उपस्थित असताना जयशंकर (विकी) कांबळे, संघर्ष कांबळे आणि पंचशील कांबळे यांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत गायकवाड यांच्याविरुद्ध उलट खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भातील वादातून ही घटना घडली. संबंधित मुलीला त्रास देऊ नये व तिचा मोबाईल परत द्यावा, अशी समज आरोपींना देण्यात आली होती. याच रागातून आरोपींनी पक्ष कार्यालयात येऊन गायकवाड व त्यांच्या पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आले. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत पुढील तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.






