Best News Portal Development Company In India

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ, कुंकू रवाना!

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ, कुंकू रवाना!
तुळजापूर प्रतिनिधी:-किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आई तुळजा – भवानीचा, शिरकाई देवीला साडी-चोळी अर्पण करण्याचा तुळजापूरला परंपरागत मान!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५२ वा सोहळा ६ जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथून आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले कुंकू, १०८ अबुंकी कवड्यांची माळ तसेच शिरकाई देवीसाठी साडी-चोळी व ओटीचे साहित्य मंगळवारी (दि. २ जून) रायगडाकडे रवाना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी पूजित झालेले कुंकू आणि १०८ कवड्यांची माळ दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पाठविण्याची परंपरा आहे. यावर्षीही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने हे पूजित साहित्य नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.
रायगडावरील राजसदरेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी परिधान करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या १०८ अबुंकी कवड्यांच्या माळांसह जगदीश्वर मंदिर, गडदेवता शिरकाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, होळीवरील पुतळा तसेच पालखी सोहळ्यातील महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र माळा पाठविण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील असे एकमेव राजे मानले जातात की ज्यांना आपल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेसोबत चांदीच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मान प्राप्त झाला. नवरात्रोत्सवात देवीच्या सिंहासनावर भवानी तलवारीसह महाराजांचा विशेष महाअलंकार मांडला जातो, ही परंपरा आजही जपली जात आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे, मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे, व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, शिवप्रेमी सतीश खोपडे, गणेश पुजारी, महेश गवळी, श्रीकांत कदम, अनिल आगलावे, शिवशंकर म्हमाणे, गणेश भिंगारे यांच्यासह अनेक शिवभक्त तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजापूरहून पाठविण्यात आलेले हे पूजित साहित्य शिवछत्रपतींच्या कुलदैवताशी असलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नात्याची पुन्हा एकदा साक्ष देणारे ठरत आहे. तरी महाराष्ट्रभरातून जास्तीत जास्त तरुण मावळ्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजर राहावे असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.