श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे, श्री. उपेंद्र गोविंद तामोरे (अपर जिल्हाधिकारी) यांनी दिनांक 02 जून 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे आज श्री उपेंद्र गोविंद तामोरे साहेब यांनी अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. श्री. तामोरे हे सन 2002 बॅचचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) असून त्यांना महसूल, नियोजन व प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. संस्थानमध्ये नियुक्तीपूर्वी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), अंधेरी, मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) म्हणून कार्यरत होते.
राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित विविध विकासकामांचे प्रभावी नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी श्री. तामोरे यांचा प्रशासकीय अनुभव उपयुक्त ठरणार आहे.
त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर कार्य करताना सुशासन, पारदर्शकता, विकासाभिमुख नियोजन व लोकाभिमुख प्रशासन यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासन, भाविक सुविधा, विकासकामे आणि मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी होणार आहे. तसेच तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या या नियुक्तीने अनुभवी अप्पर जिल्हाधिकारी आपल्या मंदिर संस्थानला लाभले आहेत. त्यांच्या प्रभावी नियोजन, अंमलबजावणी आणि सुयोग्य प्रशासन याचा फायदाच होईल. त्यांचे तुळजापूरच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत आहे.






