धाराशिवमध्ये खळबळजनक! ‘ओरा स्पा सेंटर’वर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक देहव्यापारातून ५ अबला महिलांची सुटका!
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव शहरातील घटना या घटनेने जिल्हाभर खळबळ नामांकित समजल्या जाणाऱ्या ‘ओरा (Aura) स्पा सेंटर’वर पोलिसांनी मंगळवारी (२ जून) संध्याकाळी डमी ग्राहक (पंटर) पाठवून धडक छापा टाकला. या कारवाईत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा पर्दाफाश करण्यात आला असून, ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी स्पा सेंटरचे व्यवस्थापक आणि चालकांविरुद्ध ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना या स्पा सेंटरमध्ये अवैध कृत्य सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी आधी एका पंटरचा (डमी ग्राहक) वापर केला. स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी वाहतूक आणि लैंगिक शोषण होत असल्याची खात्री पटताच, शासकीय पंचांसमक्ष संपूर्ण टीमने तिथे धाड टाकली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्पा सेंटर चालकांची एकच तारांबळ उडाली. कारवाईदरम्यान तिथून ५ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना पुढील कायदेशीर पुनर्वसन व प्रक्रियेसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक कारवाईत:
श्री. एम. एन. शेळके (पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष – AHTU)
श्री. सोनटक्के (पोलीस उपनिरीक्षक) पोलीस अंमलदारमाने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके, महिला पोलीस हवालदार, पुरी आणि जाधव.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची विशेष जबाबदारी पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. “जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर किंवा अनैतिक कृत्ये सुरू असल्यास त्यावर कडक पाळत ठेवून तात्काळ गुन्हे दाखल केले जातील. अवैध व्यवसायांत सामील असलेल्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही,” असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांनी दिला आहे. पोलीस अधीक्षकांच्या अशा धाडसी कारवायांमुळे जिल्हाभरातील अवैधरीत्या गुन्हे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.






