दुधनाळ बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत ८० वर्षीय वृद्धेसह चार महिलांचे मंगळसूत्र लंपास; सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!
तुळजापूर (प्रतिनिधी):- धाराशिव जिल्हाभरात बस स्थानकातील चोरीच्या घटनेत वाढ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बस स्थानकात पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा चोऱ्या घडतातच कशा? अशीच घटना दुधनाळ बस स्थानकात घडली प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बसस्थानकावर महिलांना लक्ष केल्याची धक्कादायक घटना उमरगा येथे उघडकीस आली आहे. दुधनाळ बसस्थानकावर झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्याने तब्बल चार महिलांचे सुमारे २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र चोरून नेले. या चोरीत एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारंगवाडी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिला शांताबाई धनराज सोमवंशी या दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उमरगा येथील दुधनाळ बसस्थानक परिसरात थांबल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्यासोबत कविता गुळगे (रा. दुधनाळ), सुनंदा सोनटक्के (रा. बेंबळी) आणि उज्वला गावडे (रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या महिला देखील तेथे उपस्थित होत्या. बस स्थानकात मोठी गर्दी होती.
बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचा फायदा अज्ञात चोरट्याने उठवला. गर्दीत धक्काधक्कीचा किंवा गडबडीचा फायदा घेऊन चोरट्याने अत्यंत शिताफीने या चारही महिलांच्या गळ्यातील २९ ग्रॅम वजनाचे मणी-मंगळसूत्रे लंपास केली.
आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलांनी तात्काळ उमरगा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी फिर्यादी शांताबाई धनराज सोमवंशी (वय ८० वर्षे) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) उमरगा पोलिसांनी दि. २ जून रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपापल्या सामानाची व दाग दागिन्यांची काळजी घ्यावी विशेषत: महिला प्रवाशांनी आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव सावधान आणि सजग राहून प्रवास करावा. काही अनुचित प्रकार दिसताच पोलिसांची संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या घटनेत लक्ष घालण्याची मागणी होत आहे.






