सावधान: श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांनो , कचरा, घाण केल्यास होणार कारवाई (SISPL), चे सुरक्षा रक्षक करणार दंडात्मक कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी:-महाराष्ट्राची कुलस्वामिनी
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे तसेच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र राखण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन शिफ्टमध्ये मंदिर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार आहेत.
या पथकांमध्ये मंदिर संस्थानचे चार शिपाई तसेच सुरक्षा सेवा पुरवठादार कंपनी SISPL चे दोन सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसरात थुंकणे, घाण करणे अथवा कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी व दुकानदारांनी आणि भाविक – भक्तांनी आपल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पावित्र राखण्याचा प्रयत्न करावा मंदिर समितीच्या या निर्णयाचे तुळजापुरातील नागरिकांतून स्वागत होत आहे.







