श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई; ९ हजार रुपयांचा दंड वसूल!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आज मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
खरंतर सर्व भाविक भक्त, आणि तुळजापूर मधील सजग व सतर्क नागरिकांनी स्वच्छतेच्या कामी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे. मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत मंदिर संस्थानकडून वारंवार आवाहन करूनही काही व्यक्तींकडून परिसरात थुंकण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत मंदिर संस्थानने अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान काही महाभाग सुधरायचं नावच घेत नाहीत अशा निष्काळजी व्यक्ती वरती कारवाई होणे गरजेचे आहे. हा एक तुळजापूर नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी व पुजाऱ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, परिसरात कोठेही थुंकू नये तसेच स्वच्छता नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.






