तुळजाभवानी मंदिर सुरक्षा: दीपक चौक ते महाद्वार मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी मंदिर संस्थानचे पोलिसांना पत्र!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दररोज तुळजापुरात हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सुरक्षितता, भाविकांची गैरसोय टाळणे आणि वाहतूक व्यवस्थापन या बाबींना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. याच अंतर्गत अत्यंत संवेदनशील असलेल्या दीपक चौक ते महाद्वार मार्गावरील लोखंडी गेट येथील वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा लेखी पत्र पाठवून आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त आणि परवान्यांची तपासणी करण्याची मागणी
दीपक चौक ते महाद्वार हा मार्ग मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो. या मार्गावरून होणारी वाहनांची वर्दळ नियंत्रित राहणे गरजेचे आहे. यासाठी या मार्गावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
या परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या प्रवेश परवान्यांची (Pass) योग्य पद्धतीने तपासणी व नियमन करण्यात यावे.
याबाबत मंदिर संस्थानने पोलीस प्रशासनास यापूर्वीच लेखी कळवले होते, मात्र यावर अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले आहे.
वाहनांचे नियंत्रण पूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या अखत्यारीत.
मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे की, दीपक चौक ते महाद्वार परिसरापर्यंत कोणत्या वाहनांना सोडायचे, याबाबतचे निर्णय, नियंत्रण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ही पूर्णपणे पोलीस विभागाच्या कार्यक्षेत्रातील बाब आहे. या संदर्भातील सर्व कायदेशीर अधिकार संबंधित पोलीस प्रशासनाकडेच आहेत.
भाविकांची सुरक्षा आणि सुलभ दर्शन व्यवस्था यासाठी मंदिर संस्थान विविध विभागांच्या समन्वयाने काम करत असून, पोलीस प्रशासनाकडून या संवेदनशील मार्गावर लवकरच कडक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






