धाराशिव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! भामट्यांनी चोरलेल्या पैशातून खरेदी केलेली ‘सोन्याची कॉईन्स’ची ऑर्डर केली रद्द; तक्रारदाराला ६४,२३२ रुपये केले रिफंड!
तुळजापूर प्रतिनिधी :- सर्वसामान्य नागरिकांना ही एक बातमी लाखमोलाची बातमी आहे. सर्वांनी सावधान आणि सतर्क राहायचं आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांना चपराक लगावत धाराशिव सायबर पोलिसांनी एका जागृत नागरिकाचे ६४,२३२ रुपये अवघ्या काही तासांत परत मिळवून देण्यात मोठे यश मिळवले आहे. सायबर चोरांनी फसवणुकीच्या पैशातून ऑनलाइन खरेदी केलेल्या सोन्याच्या कॉईन्सची ऑर्डर रद्द करायला लावून पोलिसांनी हा संपूर्ण रिफंड मिळवून दिला.
’ॲक्सिस बँक’मधून बोलत असल्याचा बहाणा, अनिकेत सरवदे यांची आर्थिक फसवणूक झाली.
वाशी (जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले २८ वर्षीय तरुण अनिकेत बापू सरवदे यांना १५ जून २०२६ रोजी एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण ‘ॲक्सिस बँक’मधून बोलत असल्याचे भासवले. क्रेडिट कार्डची लिमिट वाढवणे आणि कार्ड ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने त्याने अनिकेत यांना एक लिंक पाठवली. अनिकेत यांनी ती लिंक ओपन करून क्रेडिट कार्डची माहिती भरली आणि मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) चोराला सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ६४,२३२ रुपये गायब झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला.
तक्रारदाराची तत्परता ठरली फायद्याची!
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिकेत सरवदे यांनी वेळ न दवडता तत्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर कॉल केला आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी (NCCR) पोर्टलवर तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच धाराशिव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, चोरलेली रक्कम ‘रेझर पे’ पेमेंट गेटवेद्वारे ‘ब्ल्यूस्टोन ज्वेलर्स’ (Bluestone Jewellers) या नामांकित कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे. सायबर चोराने त्या पैशातून ऑनलाइन सोन्याची नाणी (Gold Coins) ऑर्डर केली होती.
सायबर पोलिसांनी कोणतीही वेळ न गमावता ‘ब्ल्यूस्टोन ज्वेलर्स’च्या नोडल अधिकाऱ्यांशी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगत चोराने दिलेली सोन्याच्या नाण्यांची ऑर्डर तात्काळ रद्द (Cancel) करण्यास भाग पाडले. परिणामी, अडकलेली सर्वच्या सर्व ६४,२३२ रुपयांची रक्कम फिर्यादी अनिकेत यांच्या खात्यात सुखरूप रिफंड झाली.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रीतू खोखर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यादव, सपोनि कासुळे, पोउनि सर्जे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या टीमने केली आहे.
सदर कारवाईवरून असे निदर्शनास येते की सर्वसामान्य नागरिकांनी आता असल्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यां पासून सावधान राहायचं आहे. आणि असे काही संशयित निदर्शनास येताच सायबर पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.





