श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्याचा गौरव पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल गौरव
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सीबीझेड हा ग्रुप घेऊन उत्तीर्ण झालेला माजी विद्यार्थी श्री उमाकांत गोपीनाथराव शिंदे यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
श्री शिंदे यांनी “मॉलिक्यूलर अँड फंक्शनल कॅरॅक्टेराइझेशन ऑफ अझो डाई डिग्रेडिंग जेनेटिक ट्रेट्स ऑफ बायोफॉर्म्स” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना बीएसएस कला वाणिज्य महाविद्यालय, माकणी येथील वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यावरणातील प्रदूषणकारी अझो रंगद्रव्यांचे जैविक विघटन करणाऱ्या जैवघटकांच्या आनुवंशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारे हे संशोधन पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपप्राचार्य तथा विभागप्रमुख डॉ. विनोद देवरकर यांच्या हस्ते श्री उमाकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. देवरकर यांनी श्री शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्राकडे वळून विद्यार्थ्यांनी प्रगतीशील समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ व्ही एस सूर्यवंशी तसेच बीएसएस कला वाणिज्य महाविद्यालय, माकणीचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. व्ही. माने यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी श्री शिंदे यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करून त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.







