तुळजापूर बसस्थानकात महिलेची पर्स लंपास; 99 हजारांचा ऐवज चोरीला!
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर येथील नवीन बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राहुल देशपांडे (वय 42, रा. वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटलजवळ, बार्शी, जि. सोलापूर) या 19 जून 2026 रोजी सायंकाळी 4.19 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील नवीन बसस्थानकातून बार्शीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 4 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 99 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी रुपाली देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सततच्या चोऱ्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.
प्रशासनाने योग्य ती सतर्कता बाळगून कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रवाशांनी सुद्धा संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवास करताना मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागेल.






