मातोश्री’शी गद्दारी नाही! ओमराजेंनी पक्षातच राहावे, अन्यथा…; तुळजापूर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा!
तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर शिवसैनिकांचा मोठा निर्णय “मातोश्री”शी गद्दारी कधीच नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच एकनिष्ठ व कडवट राहावे, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. मात्र, जर आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तर तुळजापूर तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते ‘मातोश्री’सोबत आणि पक्षाशीच एकनिष्ठ राहतील, असा ठाम आणि एकमुखी निर्णय आज तुळजापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या जाहीर बैठकीत घेण्यात आला.
आज तुळजापूर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.
’पक्षाशी आणि मातोश्रीशी तडजोड नाही’
बैठकीमध्ये उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांना पक्षातच राहून कडवटपणे काम करण्याचे आवाहन केले. “आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी ग्वाही देत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जर काही कारणास्तव ओमराजेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तरीही तुळजापूर तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’शीच एकनिष्ठ राहतील. कोणत्याही परिस्थितीत पक्षाशी प्रतारणा केली जाणार नाही, यावर बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या अत्यंत महत्त्वाच्या आणि वादळी बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य: जितेंद्र कानडे
शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख: शामलताई पवार
महिला आघाडी नेत्या: श्रीमती ललिताताई सावंत, शोभाताई शिंदे
प्रमुख पदाधिकारी: ऋषिकेशजी मगर, कमलाकर चव्हाण, श्याम पवार
तालुकाप्रमुख: जगन्नाथ गवळी
उपतालुकाप्रमुख / तालुका प्रतिनिधी: प्रदीप मगर, सुनील जाधव, संजय भोसले
विभागप्रमुख व इतर पदाधिकारी: महेंद्र सुरवसे, बालाजी पांचाळ, सोमनाथ घोडके, पांडुरंग लोंढे, श्याम कनकदर, अनिल छत्रे, धुळाप्पा रक्षे, रोहित चव्हाण यांसह तालुक्यातील बहुसंख्य शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा करारी बाणा दिसून आला.







