तुळजापूर भाविकांना आता ‘महाद्वारा’तून प्रवेश! दर्शन व्यवस्थेत मोठा बदल, ३ दिवसांचा प्रायोगिक उपक्रम!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी
श्री तुळजाभवानी मंदिरातील भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी दिनांक २३ जून २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत भाविकांना थेट ‘महाद्वारा’तून प्रवेश देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे.
पुजारी मंडळ आणि नगरअध्यक्षांच्या मागणीला यश!
मिळालेल्या माहितीनुसार, काल (२२ जून २०२६) माननीय नगराध्यक्ष, तुळजापूर तथा विश्वस्त सदस्य यांच्यासह तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पुजारी वर्गाने प्रशासकीय कार्यालयात जाऊन एक लेखी निवेदन सादर केले होते. भाविकांना महाद्वारातून प्रवेश देऊन दर्शन व्यवस्था राबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
अशी असेल नवीन दर्शन मार्गिका –
धर्मदर्शन आणि मुखदर्शन- भाविकांना महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. तिथून पुढे कल्लोळ तीर्थापासून पाटील वाड्याकडून, टोले यांच्या घरासमोरून दर्शन मंडपात प्रवेश दिला जाईल.
अभिषेक आणि सशुल्क पास धारक- पूर्वीप्रमाणेच अभिषेक पास धारक आणि ₹३०० देणगी पास धारकांना महाद्वारातून कल्लोळ तीर्थाच्या बाजूने प्रवेश देऊन दर्शनासाठी सोडण्यात येईल.
महत्त्वाची नोंद: हा बदल सध्या २३ जून ते २५ जून २०२६ या तीन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) लागू करण्यात आला असून, सर्व महंत, पुजारी, सेवाधारी व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (माया माने) यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.






