हिंदू-मुस्लिम एकात्मतेची त्रिशताब्दी! धाराशिवच्या भिकार सारोळा येथील जगदे कुटुंबाकडून चौथी पिढीही जपताहेत मोहरमची परंपरा!
तुळजापूर प्रतिनिधी :- सर्वधर्मसमभाव ही भावना जपण्याचा परंपरा जगदे कुटुंबाचा प्रयत्न.
आजच्या आधुनिक काळात जिथे सलोख्याची गरज अधिक भासत आहे, तिथे धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथील जगदे कुटुंबाने राष्ट्रीय एकात्मतेचे एक अनोखे आणि आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गेली ३०० वर्षे हे हिंदू कुटुंब अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने मोहरम (डोले) सण साजरा करत असून, यंदा त्यांच्या चौथ्या पिढीनेही ही वैभवशाली परंपरा तितक्याच भक्तीभावाने कायम ठेवली आहे.
अशी सुरू झाली ३०० वर्षांची परंपरा…
एक काळ असा होता जेव्हा भिकार सारोळा गावात कोणीही मोहरम सण साजरा करत नव्हते. त्यामुळे गावातील माधव जगदे हे दरवर्षी मोहरम सणाच्या काळात आवर्जून बाहेरगावी जात असत. यातूनच त्यांची मोहरम सणावर अथांग श्रद्धा जडली. याच काळात त्यांना मोहरम सणात चंद्राची कोर असलेली ‘नाल’ (नालसाहेब) मिळाली आणि त्यांनी ती गावात आणली. तेव्हापासून आजतागायत जगदे कुटुंबाने गावातच मोहरमचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली, जी आज तीनशे वर्षांनंतरही अविरत सुरू आहे.
सवारी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यंदाही हा मोहरम सण दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते:
२५ जून (रात्री): गावात मोहरमनिमित्त पहिली सवारी मिरवणूक काढण्यात आली.
२६ जून (दिवसभर): विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२६ जून (रात्री ७ ते १०): संपूर्ण गावातून नालसाहेबांची अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात भव्य सवारी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते. सर्वधर्मसमभावाचे दर्शन: हा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत खांद्याला खांदा लावून परिश्रम घेतले. यामुळे गावात राष्ट्रीय एकतेचे आणि सलोख्याचे दर्शन घडले.
हा पारंपरिक उत्सव मोठ्या थाटात पार पाडण्यासाठी जगदे कुटुंबासह गावातील प्रमुख नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
जगदे कुटुंब:- आण्णा जगदे, बापू जगदे, सुधाकर जगदे, जनक जगदे, गणेश जगदे, योगेश जगदे, सचिन जगदे.
ग्रामस्थ (हिंदू बांधव): बापू कोळी, अच्युत मोरे, गणेश तनमोर, बंडू माने, विजय मेदने, आण्णा माने, पप्पू माने, गणेश मोरे, ओम कोळी, संतोष कोळी, पांडुरंग विश्वासे, भैय्या तनमोर, नागनाथ मेदने, दशरथ मेदने, अभिषेक पाटील.
ग्रामस्थ (मुस्लिम बांधव): मैनुद्दीन शेख, मेहेबुब शेख, अमीन शेख, मजनू शेख, अहमद शेख.
भिकार सारोळा गावातील या उपक्रमाचे आणि जगदे कुटुंबाच्या या ३०० वर्षांच्या परंपरेचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, हा सण खऱ्या अर्थाने देशाच्या एकात्मतेला बळ देणारा ठरत आहे.






