दि. २७ जून २०२६ (शनिवार) रोजी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घडलेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण!
तुळजापूर प्रतिनिधी:- तीर्थक्षेत्र तुळजापूर साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री आई तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांकडून सुरक्षारक्षकास मारहाण प्रकरणी मंदिर समितीकडून अधिक खुलासा करण्यात आलेला आहे. सदर प्रकार निंदनीय आहे.
सोशल मीडियावर श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घडलेल्या घटनेबाबत काही दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. या संदर्भातील वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
दि. २७ जून २०२६ (शनिवार) रोजी दुपारच्या सुमारास मुखदर्शन टनेल परिसरात पुणे येथील व हैदराबाद येथील दोन भाविकांच्या गटांमध्ये रांगेत पुढे जाण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर परस्परांतील हाणामारीत झाले.
घटनेची माहिती मिळताच तेथे तैनात असलेले मंदिर सुरक्षा रक्षक तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांतील भाविक उपस्थित असल्याने अतिरिक्त सुरक्षा रक्षक तसेच पोलीस अधिकारी यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणून संबंधित सर्व भाविकांना पुढील बाबीसाठी मंदिर पोलीस चौकी येथे नेण्यात आले.
या संपूर्ण घटनेत मंदिराच्या कोणत्याही सुरक्षा रक्षकाने कोणत्याही भाविकास मारहाण केलेली नाही. सुरक्षा रक्षकांनी केवळ वाद थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणणे, भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि संबंधितांना पोलीस चौकीपर्यंत पोहोचविणे हीच आपली जबाबदारी पार पाडली आहे.
त्यामुळे मंदिर सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या, तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सर्व भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत असून मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन सतत दक्षतेने कार्यरत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई पोलिसांकडून करण्यात येईल असे आश्वासन मंदिर समितीकडून देण्यात येत आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य पावले उचललेली जातील.






