श्री.तुळजाभवानी इनाम जमिनींबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात खुलासा !
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर समितीकडून जमीन हस्तांतर बाबत सविस्तर खुलासा अलीकडे काही प्रसार माध्यमांमध्ये “तुळजाभवानी देवस्थानच्या ४,१२१ एकर जमिनीचा महाघोटाळा” या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सदर बातमीमुळे श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान संस्थान, विश्वस्त मंडळ तसेच प्रशासनाबाबत समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने संस्थानची अधिकृत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
सदर वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी वृत्तवाहिन्यानी सर्व बाबींची पूर्ण माहिती घेऊन वृत्त प्रसारित करणे आवश्यक असताना एकतर्फी माहितीच्या आधारे वृत्तांकन करण्यात आले असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, संबंधित काही बातमीमध्येच कथित फेरफार मंदिर संस्थानास अंधारात ठेवून झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला असताना, “देवस्थानच्या/संस्थानच्या जमिनीचा महाघोटाळा” असा मथळा देण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य वाचकांच्या मनात मंदिर संस्थान, विश्वस्त मंडळ किंवा मंदिर संस्थानचे अधिकारी या कथित प्रकरणास जबाबदार असल्याचा चुकीचा समज निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान स्पष्टपणे नमूद करते की, कथित महसुली फेरफारांबाबत मंदिर संस्थानची मालकी किंवा भोगवटा नसलेने सक्षम न्यायालयाने किंवा शासनाने संस्थान, विद्यमान विश्वस्त मंडळ अथवा प्रशासन यांना पक्षकार केलेले नाही. अशा परिस्थितीत संस्थानाशी संबंधित असल्याचा आभास निर्माण करणारे वृत्तांकन वस्तुस्थितीला धरून नाही.
संबंधित निवेदक यांनी माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिलेल्या निवेदनामध्ये इनाम जमिनीपैकी 400 एकर जमिनीच्या कथित घोटाळ्यासंबंधी मजकूर असल्याचे निवेदक यांच्या ध्वनीचित्रफितीमध्ये स्पष्टपणे दिसून येत असताना अनेक प्रसार माध्यमांनी सुमारे 4121 एकर जमिनीचा घोटाळा/ जमिनीची विक्री असे शीर्षक दिले आहे. वास्तविक सदर इनाम जमीन ती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे नाहीत आणि त्यामुळे त्यांचे हस्तांतरण बाबत मंदिर संस्थान प्रशासन अथवा विश्वस्त मंडळ याना कोणतेही अधिकार नाहीत.
नमूद असलेले 400 एकर जमिनीवर खाजगी लोकांची नावे नोंदविताना , सदरील फेरफार होत असताना मंदिर संस्थान अथवा मंदिर प्रशासनास कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नव्हती.त्याचप्रमाणे मंदिर संस्थानचे म्हणणे ऐकून घेण्यात आलेले नाही.
इनाम जमिनीवर खाजगी लोकांची नावे लावणे संबंधी तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांचे आदेश हे 1990 चे सुमारातील असुन बहुतांशी आदेश म्हणजे संस्थांचे वतीने सक्षम न्यायालयात आव्हाने करण्यात येऊन त्यामध्ये श्री देवीजींचे नावाची नोंद देखील महसूल पत्रके करण्यात आलेली आहे. असे असताना वरील परिस्थितीत विश्वस्त तसेच प्रशासनाने कथित महाघोटाळा केला असे शीर्षक देऊन वृत्त प्रसारित करणे हे चुकीचे आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, अशा प्रकारच्या अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या वृत्तांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होणे तसेच संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
संस्थान संबंधित वृत्ताचे परीक्षण करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याचा विचार करीत आहे. तसेच संबंधित प्रसारमाध्यमांकडून वस्तुस्थितीवर आधारित खुलासा व संस्थानची बाजू त्याच ठळकपणे प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सर्व भाविकांना आवाहन करते की, याबाबत वस्तुस्थिती समजून घेऊन गैरसमज टाळावा
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सर्व बाबींमध्ये पारदर्शकतेला व कायद्याच्या अधीन राहून कार्य करण्यास कटिबद्ध आहे.
— श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर






