श्री तुळजाभवानी देवीजींच्या चरणी डॉ. सौरभ माणिकराव मसारे यांच्याकडून चांदीचा मुकुट अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जगत- जननी, आदिमाया, आदिशक्ती, आई श्री तुळजाभवानी मातेवरील अखंड श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त करत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील डॉ. सौरभ माणिकराव मसारे यांनी कै. प्रभाकर मसारे (आजोबा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक 03 जुलै 2026 रोजी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी सुमारे 1006.730 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला.
डॉ. मसारे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी हा मुकुट भक्तिभावाने आणि उत्साहात अर्पण केला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने सदर देणगी अधिकृतरीत्या स्वीकारून तिची नोंद केली.
आई तुळजाभवानी आणि तिचे भक्त यांच्यात एक अतूट नाते आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी तिची ख्याती आहे. काही कामानिमित्त नवस बोलणे आणि ते काम पूर्ण झाले की नवस पूर्ण करणे ही परंपरा आई तुळजाभवानी मंदिरात पूर्वीपासून चालत आलेली आहे. भक्तांचे संगोपन करणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देणगीदारांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी डॉ. मसारे यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी सर्व भाविकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली.








