Best News Portal Development Company In India

माझे गाव आरोग्य संपन्न गाव तालुकास्तरीय कृती दल बैठकीत बैठक संपन आरोग्य, स्वच्छता, योग, वृक्षारोपण आणि जनजागृतीवर भर!

माझे गाव आरोग्य संपन्न गाव
तालुकास्तरीय कृती दल बैठकीत बैठक संपन
आरोग्य, स्वच्छता, योग, वृक्षारोपण आणि जनजागृतीवर भर
तुळजापूर –
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाला तुळजापूर तालुक्यात अधिक गती देण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक मंगळवारी (दि. ३० जून) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडली. गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्यदायी, स्वच्छ आणि निरोगी गाव घडविण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पत्रकार प्रतिनिधी श्रीकांत कदम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आरोग्यदायी गावासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
बैठकीत जून महिन्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य संपन्न गाव कृती दलाच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली.
किशोरवयीन मुला-मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता, जीवन कौशल्य प्रशिक्षण आणि किशोरवयीन आरोग्य विषयक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच १० ते १६ जून या कालावधीत नेत्ररोग प्रतिबंध व उपचाराबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
योग, वृक्षारोपण आणि हिवताप प्रतिबंधावर विशेष भर
प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी दररोज योगाभ्यास करावा यासाठी योगाचे महत्त्व गावागावात पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले.
जून महिना ‘हिवताप प्रतिरोध महिना’ म्हणून कीटकजन्य आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आल्याचा आढावा घेण्यात आला.
कचरा व्यवस्थापन आणि नोंदी जतन करण्याच्या सूचना
घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून योग्य पद्धतीने संकलन करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या अभियानाशी संबंधित सर्व अहवाल, छायाचित्रे आणि सादरीकरणे गाव, उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीच्या शेवटी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” हे अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि जुलै महिन्यातील सर्व उपक्रम वेळेत पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india