जिमचे सामान देण्याच्या बहाण्याने तरुणाला ५ लाखांचा गंडा; तुळजापुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- निरोगी राहण्यासाठी जिमचे साहित्य खरेदी करणाऱ्याच्या आरोग्याशी खेळ आणि फसवा-फसवीचा गोरख धंदा उघड . जिमचे साहित्य खरेदी करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये घेऊनही साहित्य न देता, तसेच पैसेही परत न करता एका तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर येथे समोर आला आहे. या प्रकरणी मंथन संतोष कदम (वय २७, रा. वेताळनगर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंथन कदम यांनी जिम सुरू करण्यासाठी आरोपी शुभम गाडेकर (रा. घायाळ नगर, जालना), प्रितम नेताजी केवडकर (रा. तुळजापूर, सध्या मुक्काम भाग्यनगर, जालना) आणि आमित बाबुराव (रा. घायाळनगर, जालना) यांच्याशी संपर्क साधला होता. जिमचे साहित्य खरेदी करण्यासाठी कदम यांनी आरोपींना एकूण ५,००,००० रुपये (पाच लाख रुपये) रोख आणि ऑनलाईन स्वरूपात दिले होते.
हा व्यवहार १२ जून २०२६ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास हंगरगा रोडवरील प्रतीक्षा नगर, कृष्णा सोसायटी, तुळजापूर येथे झाला होता.
पैसे देऊन बराच काळ उलटल्यानंतरही आरोपींनी फिर्यादीस जिमचे कोणतेही सामान दिले नाही. जेव्हा कदम यांनी त्यांच्याकडे साहित्याची किंवा पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी “तुझे पैसेही देणार नाही आणि सामानही देणार नाही” असे म्हणून थेट धमकावण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंथन कदम यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी मंथन कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) ५ जुलै २०२६ रोजी आरोपी शुभम गाडेकर, प्रितम केवडकर आणि आमित बाबुराव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
थोडक्यात माहिती-
फिर्यादी: मंथन संतोष कदम (वय २७, रा. तुळजापूर)
आरोपी: शुभम गाडेकर, प्रितम केवडकर, आमित बाबुराव (सर्व रा. जालना/तुळजापूर)
फसवणुकीची रक्कम: ₹ ५,००,००० (रोख व ऑनलाईन)
दाखल कलम: भा.न्या.सं. ३१८(४) या गंभीर प्रकरणाचा तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






