धक्कादायक! भूममध्ये मोठ्या प्रमाणावर दुधातील भेसळीचे रॅकेट उघड; नामवंत कंपन्यांसह ७ जणांवर गुन्हे दाखल !
तुळजापूर प्रतिनिधी :- धाराशिव जिल्ह्यातील औषध व अन्न प्रशासन अधिकारी ॲक्शन मोडवर दुधात भेसळ करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या. दुधात मोठ्या प्रमाणावर व्हे आणि व्हे परमीएट पावडरची भेसळ करून दूध संकलन केंद्रांना पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भूम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) आणि भूम पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ६१ गोण्या भेसळयुक्त पावडर जप्त केली असून, याप्रकरणी ७ जणांसह इतरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक व डेअरी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी (FDA, धाराशिव) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, ‘मधुबन ट्रेडिंग कंपनी’ (इंदिरानगर, भूम, जि. धाराशिव) येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यात वेगवेगळ्या ६ नामांकित ब्रँडच्या तब्बल ६१ गोण्या (प्रत्येकी २५ किलो वजन) ‘व्हे पावडर’ आणि ‘व्हे परमीएट पावडर’ मिळून आली. हा साठा दुधामध्ये भेसळ करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला होता.
यांच्यावर गुन्हा दाखल (आरोपींची नावे)
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भूम पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत-
१. बाळासाहेब मधुकर गोडगे (प्रो.प्रा. मधुबन ट्रेडिंग कंपनी)
२. हेमंत टेके (हेमंत कॉर्पोरेशन, टेकेवाडा, मु.पो. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर)
३. धर्मराज शिंदे
४. गजानन कांबळे
५. काकासाहेब डोंबले
६. पल्लवी गजानन कांबळे (प्रो.प्रा. मेम्बाई दूध संकलन केंद्र)
७. काशिनाथ आंबदास डोंबले (प्रो.प्रा. ईश्वरी दूध संकलन केंद्र)
(यांच्यासह इतर भागीदार व संबंधितांचा शोध सुरू आहे.)
या कायद्यांनुसार आवळल्या आवळल्या मुसक्या:
अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी (वय २६ वर्षे) यांनी दि. ७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) भूम पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कलमे लावली आहेत:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ३(५), ६१, १११, २७४, २७५ (संघटित कट रचणे, मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या अन्न पदार्थांची भेसळ व विक्री करणे).
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ (नियमन २०११): कलम २६, ३७, ३(१),(zz),(iv), आणि ५९.
”ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” > हा साठा जप्त करण्यात आला असून, ही भेसळयुक्त पावडर कोणकोणत्या दूध केंद्रांना पुरवली जात होती आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास भूम पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकारी.
नागरिकांनी सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे भेसळयुक्त पदार्थापासून दूर राहावे असा अनुचित प्रकार दिसताच पोलिसांची संपर्क साधावा
असे आवाहन करण्यात येत आहे.






