वसुलीचे दुकान’ की शिक्षण संस्था? तुळजापुरात शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कलिस्टसाठी पालकांची आर्थिक लूट!
तुळजापूर प्रतिनिधी :- शालेय कागदपत्रासाठी विद्यार्थी आणि पालकांची लूट. तुळजापूर
शहरासह परिसर क्षेत्रात सध्या शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आणि पालकांची उघडउघड आर्थिक लूट सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (TC) आणि मार्कलिस्ट (गुणपत्रिका) देताना विविध कारणे पुढे करून अवैधरित्या पैशांची उकळपट्टी केली जात आहे. संतापजनक बाब म्हणजे या वसूल केलेल्या रकमेची कोणतीही अधिकृत पावती पालकांना दिली जात नसल्याने, शिक्षण संस्थांच्या या मनमानी कारभाराविरुद्ध त्रस्त पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थी आणि पालकांची होणारी ही पिळवणूक थांबवण्यासाठी शिक्षण संचालनालयाने ५ जून २०२५ रोजी एक कडक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार-
शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कलिस्ट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम आकारली जाऊ नये.
अशी बेकायदेशीर वसुली आढळल्यास संबंधित शाळा किंवा महाविद्यालयावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी.
तसेच, विद्यार्थ्यांकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम तात्काळ परत करण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
मात्र, तुळजापूर परिसरातील शिक्षण संस्था चालक या शासकीय परिपत्रकाला साफ हरताळ फासताना दिसत असून, प्रशासनाचा कोणताही भिती त्यांना राहिलेली नसल्याचे चित्र आहे.
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, याच अधिकाराचा गैरफायदा घेत काही संस्था चालकांनी शिक्षणाचे बाजारीकरण करून ‘वसुलीची दुकाने’ थाटली आहेत. या बेकायदेशीर वसुलीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला सामान्य पालक वर्ग पुरता हवालदिल झाला आहे.
“आम्हाला विविध कारणांचे निमित्त सांगून पैशांची मागणी केली जाते आणि पावती मागितली तर ती देण्यास नकार दिला जातो. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा संस्थांवर तात्काळ कारवाई करावी— एका त्रस्त पालकाची उद्विग्न प्रतिक्रिया.
आता या प्रकरणी शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या वसुलीच्या दुकानांवर कधी आणि कशी कारवाई करणार? पालकांना त्यांचा हक्क विनासायास मिळणार का? याकडे संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. पालकांनी आता अशा संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.






