श्री तुळजाभवानी मंदिर येथे दिव्यांग व अतिवृद्ध भाविकांसाठी मोफत डोली व खुर्ची सेवा!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आई कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे दर्शनासाठी चालत जाण्यास अडचण असलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच अतिवृद्ध भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासकीय कार्यालया येथून मोफत डोली व खुर्ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मुख्य पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे दर्शनासाठी पायी चालणे शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. ही सेवा मंदिर संस्थानामार्फत पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार भाविकांना योग्य मार्गदर्शन व सहाय्यही करण्यात येत आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर प्रशासकीय कार्यालयाशी अथवा मंदिर कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. तेथून आवश्यकतेनुसार डोली अथवा खुर्चीची व्यवस्था करून संबंधित भाविकांना दर्शनासाठी सहाय्य करण्यात येत आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर हे प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुलभ व सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सातत्याने विविध सुविधा उपलब्ध करून देत असून, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक भाविकांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तुळजापूर मंदिर संस्थानच्या या निर्णयामुळे दिव्यांग आणि अतिवृद्ध व्यक्तींच्या श्री आई तुळजाभवानी दर्शनाचा मार्ग सुखकर झालेला आहे. या निर्णयाचे नागरिकांतून दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींकडून , भाविक भक्ताकडून स्वागत होत आहे.







