तुळजापूर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट! कात्री गावात घरफोडीसह दुचाकी लंपास; १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरीला!
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यात चोरांनी अक्षरशा हैदोस घातलेला आहे. तुळजापूर तालुक्यातील कात्री गावात अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत घरफोडी आणि दुचाकी चोरीची मोठी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरांनी घराचा कोयंडा तोडून सोन्याचे दागिने आणि शेजाऱ्यांची मोटरसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार कात्री (ता. तुळजापूर) येथील रहिवासी शरद साहेबराव सोनवणे (वय ४० वर्षे) हे दि. ११ जुलै २०२६ रोजी रात्री आपल्या कुटुंबासह झोपले होते. रात्री १०:०० ते दि. १२ जुलैच्या पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरांनी घरातील ७५,००० रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
एवढ्यावरच न थांबता, चोरट्यांनी सोनवणे यांच्या शेजारी राहणारे शंभु कुंडलीक येल्लाळ यांची घराबाहेर लावलेली ६०,००० रुपये किमतीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ बीई ७८२०) देखील चोरून नेली.
चोरी गेलेला एकूण मुद्देमाल-
सोन्याचे दागिने (१५ ग्रॅम) – ७५,००० ₹
मोटरसायकल (MH 25 BE 7820) – ६०,००० ₹
एकूण किंमत- १,३५,००० ₹
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दि. १२ जुलै रोजी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शरद सोनवणे यांनी तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे कात्री व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता. अनुचित प्रकार दिसताच पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







