धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई: २५ लाखांच्या अवैध गुटख्यासह स्कॉर्पिओ जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांनी रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल २५ लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती पक्की माहिती
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांना दि. १२.०७.२०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. एमएच २५ बी.एफ. ३६९६) प्रतिबंधित गोवा गुटख्याची चोरटी वाहतूक होणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील हायवेवर सापळा रचला.
मध्यरात्री टाकला छापा, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत-
दि. १२ जुलै रोजी रात्री २३.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी संशयित स्कॉर्पिओ गाडी अडवून तिची झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना गाडीत खालील मुद्देमाल आढळून आला.
गोवा गुटखा डायरेक्टर पान मसाला: ४० गोण्या (१,८०० पॅकेट)
SHOT LUXURY CHEWING TOBACCO: ४० गोण्या (१,८०० पॅकेट)
एकूण गुटख्याची किंमत: ₹१०,३६,८००/-
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (MH 25 BF 3696): अंदाजे किंमत ₹१५,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹२५,३६,८००/-
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालासह खालील आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे:
१. गणेश मारुतीराव धुमाळ (वय ३४ वर्षे, रा. उपळाई रोड, एकता गणपती चौक, बार्शी, जि. सोलापूर)
२. रोहन रविंद्र कदम (रा. आळणी, ता. जि. धाराशिव)
३. जाफर जमादार (रा. आळण, राज्य कर्नाटक)
४. अमोल गुंजाळ (रा. आळणी, ता. जि. धाराशिव)
५. पवन जिवन पौळ (रा. आळणी, ता. जि. धाराशिव)
सदरची यशस्वी कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे, पोलीस अंमलदार माळी, आणि पोलीस अंमलदार जाधवर यांच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.








