नळदुर्ग नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण; दोन्ही आरोपींची न्यायालयातून निर्दोष मुक्तता !
तुळजापूर – तालुक्यातील नळदुर्ग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि इतर कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायालयाने हा निकाल दिला. विशेष म्हणजे साक्षीदार हे सरकारी कर्मचारी होते यातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता हे या प्रकरणातील विशेष बाब आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ जुलै २०२२ रोजी सकाळी नळदुर्ग नगरपालिकेचे कर्मचारी दुर्गानगर परिसरात शासकीय कामानिमित्त गेले होते. यावेळी परिसरात रस्ते व गटाराची कामे करण्याच्या कारणावरून आनंद मधुकर खारवे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर लक्ष्मण बंडगर व त्यांची पत्नी सुनीता बंडगर यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घटनेप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३४१, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान या प्रकरणात पाच ते सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदार फितूर झाले नसले तरी त्यांच्या जबाबातील विसंगती तसेच इतर कायदेशीर त्रुटींचा विचार करून माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे साक्षीदार हे सरकारी कर्मचारी होते
या प्रकरणात आरोपींची बाजू ॲड. एम. बी. माढेकर यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड .धर्मराज सरडे, ॲड . विशाल बारकुल ॲड. संकेत भोसले, यांचे सहकार्य लाभले.






