*माझ्याकडे सभापती म्हणून पाहण्यापेक्षा मला विद्यार्थी म्हणूनच पहा :- ॲड.आकांक्षा चौगुले.*
*उमरगा येथे गौरव व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
उमरगा दि. 15 रोजी ज्ञानज्योती फाउंडेशन उमरगा व पंचायत समिती उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील विभागीय परीक्षेद्वारे, पदोन्नतीने नियुक्त अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक, , सेवेत कायम झालेले साधन व्यक्ती केंद्रस्तरीय विशेष शिक्षक ,उत्कृष्ट सेवा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव व सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उषाताई रविंद्र गायकवाड, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती, जिल्हा परिषद धाराशिव या होत्या. संयोजक एडवोकेट आकांक्षाताई ज्ञानराज चोगुले, सभापती पंचायत समिती उमरगा, प्रमुख उपस्थिती रेखा ताई इंगळे, उपसभापती पंचायत समिती उमरगा तसेच पंचायत समिती उमरगाचे सदस्य, श्रीमती महानंदा कलबुर्गे, श्रीमती स्नेहा जाधव, श्रीमती रुक्मिणी कांबळे, श्री तुकाराम जाधव, श्री रविंद्र हंगरगे, याचबरोबर नगरसेविका प्रिया पवार व अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. अमोल रजपूत गटशिक्षणाधिकारी उमरगा यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील कार्य, शिक्षकांची जबाबदारी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे व आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहण्याचे एडवोकेट आकांक्षा ताई यांनी आवाहन केले.
शिक्षक हा समाजाचा कणा असतो व त्यांच्या कार्यावर देशाचे भविष्य घडत असते ,म्हणून त्यांच्या कार्याचा हा सन्मान असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी काढले.
यावेळी समाज कल्याण विभागामार्फत उमरगा तालुक्यातील २५ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नावाने प्रत्येकी ₹२०,००० रुपयांच्या मुदत ठेवी (एफ.डी.) करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. व दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यानंतर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, माजी केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती केंद्रस्तरीय विषय शिक्षक, विशेष कार्य करणारे शिक्षक, नवनियुक्त मुख्याध्यापक, कार्यालयीन संगणक लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ लेखापाल तसेच सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा शाल, पर्यावरण पूरक रोपटे, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पांढरे पुष्पलता व श्री फुरडे धनराज यांनी केले, तर सौ. शिला मुदगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा सन्मान सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.








