Best News Portal Development Company In India

अनाथाश्रमातील मुलांसोबत अनुभवला मायेचा ओलावा; स्नेहाच्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले…

अनाथाश्रमातील मुलांसोबत अनुभवला मायेचा ओलावा; स्नेहाच्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले…

रुपाली शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद बालगृहातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप…                              उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.एकुरगावाडी, ता. उमरगा येथील ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ, कदेर संचलित तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे बालगृह येथे व्ही.व्ही.ए. फाऊंडेशनच्या संचालिका सौ. रुपालीताई शिवाजी शिंदे यांचा ४९ वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने परंतु आदर्शवत पद्धतीने साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत बालगृहातील विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मंडळाच्या सौ. मीराताई मोटे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापिका सौ. विजयाताई बेलकेरी, विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, उमरगा तालुका ग्राहक पंचायतचे संघटक धनराज शिंदे, मुख्याध्यापक गोविंद शिंदे, भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातील सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे, व्ही.व्ही.ए. फाऊंडेशनच्या सदस्या ऐश्वर्या शिंदे, योगेश पांचाळ, सूर्यकांत कावळे, पद्मावती शिंदे, सारिका कटके, सुलभा कटके आदींची उपस्थिती होती.
​कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि शिवाजी शिंदे व सौ. रुपाली शिंदे यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रा. विजया बेलकेरी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. महेश मोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शिंदे दाम्पत्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात मीराताई मोटे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. या उपक्रमासाठी राजेंद्र कटके, रेवण कटके, वैभव कटके, गोविंद कटके, रोहन शिंदे आदींनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव तर आभार गोविंद शिंदे यांनी मानले. या प्रसंगी परिसरातील नागरिक व बालगृहाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनाथाश्रमातील मुलांसोबत अनुभवला मायेचा ओलावा; स्नेहाच्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले :
माणुसकीच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपताना अनाथ आश्रमातील मुलांसोबत काही क्षण घालवून त्यांना मायेचा आधार देण्याचा उपक्रम नुकताच पार पडला. तालुक्यातील एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे बालगृह व शाळा येथे मान्यवर आणि दानशूर व्यक्तींच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली.
​या भेटीदरम्यान, आश्रमवासी मुलांसाठी एक वेळच्या भोजनाचे आयोजन करण्यात आली होती. पोटभर जेवण आणि मिळणाऱ्या आपुलकीच्या प्रेमामुळे मुलांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. केवळ जेवणच नाही, तर या मुलांशी मनमोकळा संवाद साधताना त्यांच्यातील जिद्द आणि निरागसता अनुभवायला मिळाली. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना बोलून दाखवतानाच, त्यांनी आपल्या विविध कला आणि कौशल्यांतून बनवलेल्या विविध साहित्यकृतींचे प्रदर्शनही उपस्थितांना दाखवले. त्यांच्या या कल्पकतेचे सर्वांनी कौतुक केले.
​याप्रसंगी आश्रमवासी विद्यार्थ्यांनी बनविलेले पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, पाहुणे घरी आल्यानंतर जसा आनंद होतो, तसाच आनंद येथील विद्यार्थ्यांना आम्हाला पाहून झाला होता. मुलांच्या चेहऱ्यावरील हा आनंद आमच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या सदिच्छा भेटीमुळे मुलांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून, त्यांना समाजाचा एक भाग असल्याचा दिलासा मिळाला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india