Best News Portal Development Company In India

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अधिकारी बनलेल्या निवासी नायब तहसीलदार अर्जुन प्रतापसिंह अरोरा यांचा नळदुर्ग बसस्थानकात सत्कार!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अधिकारी बनलेल्या निवासी नायब तहसीलदार अर्जुन प्रतापसिंह अरोरा यांचा नळदुर्ग बसस्थानकात सत्कार!
—————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड): प्रतिनिधी : अक्कलकोट तालुक्याचे नवनियुक्त निवासी नायब तहसीलदार अर्जुन प्रतापसिंह अरोरा यांनी १ जुलै रोजी पदभार स्वीकारल्यानंतर नळदुर्ग बसस्थानक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, पत्रकार विलास येडगे तसेच शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे गावचे रहिवासी असलेले अर्जुन प्रतापसिंह अरोरा यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेत उच्च शिक्षण पूर्ण केले. ते अवघे दहा वर्षांचे असताना दुर्दैवी घटनेत त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गमावले. त्यानंतर वडिलांच्या मित्रांच्या आश्रयाने रानात मिळेल ती कामे करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.
बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. अठरा विश्व दारिद्र्य आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अक्कलकोट तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अरोरा यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. त्यांनीही सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या सत्कार समारंभास पत्रकार उत्तम बनजगोळे, नळदुर्ग बसस्थानकाचे महेश डुकरे, मुकुंद वैद्य, गुंडू डुकरे, उमाकांत कुंभार, दत्ता रोकडे, दिलीप पवार, वंदना धुमाळ, लक्ष्मी फुलारी, शेतकरी संघटनेचे बबन जोशी, सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील,महादेव बिराजदार तसेच नळदुर्ग बसस्थानकातील वाहक, चालक, कंडक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india