भारतीय टी-२९ संघाचा उपकर्णधार टिळक वर्मा तुळजापूरच्या चरणी; आई तुळजाभवानीचे घेतले मनोभावे दर्शन!
तुळजापूर प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्राचे आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत तुळजापूर येथे भक्ती- शक्तीचा अनोखा संगम पाहावयास मिळाला. भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार टिळक वर्मा याने आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजापूर येथे जाऊन श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले. आगामी क्रिकेट कारकिर्दीत उत्तम यश मिळावे यासाठी त्याने देवीच्या चरणी प्रार्थना केली.
प्रशासनातर्फे जंगी सत्कार आणि स्वागत-
टिळक वर्मा मंदिर परिसरात पोहोचताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. कीर्ती किरण पुजार यांनी टिळक वर्मा यांचे अधिकृत स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना श्री तुळजाभवानी देवीजींची देखणी प्रतिमा आणि पवित्र प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.
”भारतीय क्रिकेटचा चमकता तारा आणि टी-२० संघाचा उपकर्णधार टिळक वर्मा याला त्याच्या आगामी उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि भावी वाटचालीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे हार्दिक शुभेच्छा!”
— श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान
मान्यवरांची उपस्थिती आणि चाहत्यांची गर्दी
या सुवर्णक्षणी विधानपरिषदेचे आमदार श्री. विक्रम काकडे यांची देखील विशेष उपस्थिती होती. यासोबतच. मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने
मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि पुजारी बांधव उपस्थित होते.
भारतीय संघाच्या या युवा उपकर्णधाराला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि त्याची एक झलक टिपण्यासाठी स्थानिक नागरिक व भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. शांतता आणि शिस्तीत टिळक वर्माचा हा दर्शन सोहळा संपन्न झाला.







