उपजिल्हा रुग्णालयातील सिस्टम आजारी, आमदारांच्या सुचनांना वैद्यकीय अधिक्षकांकडून कोलदांडा
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
अपंग प्रमाणपत्र व युनिक आयडीसाठी पैसे घेतले जातात, शिशुंचे अतिदक्षता विभाग रात्री बंद आहे, रक्ताचा तुटवडा, जन्म प्रमाणपत्र, ओपीडीतील अनियमितता, बायोमेट्रिकविना पगार, यापूर्वीच्या एकाही अहवालावर कारवाई होत नाही, बैठकीत सुचनां देऊन कोणतीही सुधारणा होत नाही आदी तक्रारी आढावा बैठकीत धडकल्या. नोडल ऑफिसर बदलणे व रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रुग्णालय परिसरात लावणेची सुचना आमदार प्रवीण स्वामी यांनी केली पण नोडल अधिकारी बदलणेस व पार्किंगला जागे देणेस वैद्यकीय अधिक्षक कोमल गरड यांनी सर्वासमक्ष नकार दिल्याने सभागृह अवाक झाले.
उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध समस्या निवारणासाठी शुक्रवारी (दि.१७) आमदार प्रवीण स्वामी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पंचायत समिती सदस्य हरी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार, साबांचे उपविभागीय अभियंता नागनाथ सगर आदी उपस्थित होते. यावेळी १२० पदापैकी २७ जागा रिक्त आहेत. रुग्णालयात रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टरकडून अहवाल घ्यावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य हरी जाधव यांनी युनिक आयडीचा कॅंप दर बुधवारी काढण्यात येतात. प्रमाणपत्र वितरणासाठी पैसे घेतले जातात. प्रत्येक अपंग प्रमाणपत्रासाठी दोन हजार रुपये घेतले जातात, पैसे नाही दिले तर धाराशिवला पाठवत आसल्याची तक्रार केली. तर रुग्णालय परिसरात दारुच्या बाटल्या आढळून येतात, शिशु अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी नसलेल्या नावाखाली ते बंद ठेवण्यात येत आहे. यावेळी शिशु अतिदक्षता विभाग पूर्णवेळ सुरू ठेवणे साठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. तो विभाग पूर्णवेळ सुरू करण्यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याचे आमदारांनी सांगितले. रुग्णालयातील शवपेटी बंद असल्याने येथे एक शवपेटी खरेदीसाठी १० लाख रुपये देण्याची घोषणा आमदार प्रवीण स्वामी यांनी केली. रुग्ण तपासणी वेळेत होत नसल्याने ओपीडी सकाळी ८.३० वाजता सुरु करुन सायंकाळी ४ ते ६ पर्यंत सेवा देण्याची सुचना करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असुन रक्त उपलब्ध करण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्याची सुचना देऊन रक्तसंकलणासाठी स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. जन्म दाखला मिळण्यासाठी पुरावे नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर २००४ नंतरचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन मिळतात तर त्यापूर्वीचे जन्म दाखले देण्याची सुचना देण्यात आली. यावेळी बैठकीत दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व कामात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. पहिल्यांदा सही नाही नंतर म्हणाल्या अंधारात ठेवून सही घेतल्याचा वैद्यकीय अधिक्षकांचा दावा – रुग्णालय दुरुस्तीचे काम झाले आहे परंतु काम अपूर्ण असल्याची तक्रार वैद्यकीय अधिक्षकांनी केली यावर काम पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिक्षकांना काम दाखवून कामाची ताबा घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नागनाथ सगर यांनी सांगितले तर मी सहीच केली नसल्याचे वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितले. यानंतर सदरची ताबा पावती मागवण्यात आली व वैद्यकीय अधिक्षकांनी मला दुसरे काम सांगुन अंधारात ठेवून सही घेतल्याची सारवासारव केली.अंदाजपत्रकाप्रमाणे शौचालयाचे भांडे आहेत का याची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर अंदाजपत्रकात ८ भांडे असताना १२ भांडे बसवल्याचे निदर्शनास आले. नोडल ऑफिसरांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर आमदार स्वामी यांनी त्यांना बदलण्याची सुचना दिल्यानंतर दुसरे कोणीही काम करत नसल्याचे मी त्यांना बदलू शकत नाही असे उत्तर वैद्यकीय अधिक्षकांनी दिले. तर रुग्णालयाचे एक गेट केवळ वैद्यकीय अधिक्षकांच्या गाडीसाठी राखीव ठेवल्याने रुग्णालयासमोरच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रुग्णवाहिकेसह स्थानिकांना त्रास होत असल्याने गेटमध्ये पार्किंग करण्याची सुचना आमदारांनी केली परंतु गाडयामुळे कठडा तुटेल, लोख झाडावर थुंकतील यामुळे ते गेट पार्किंगसाठी उघडणार नसल्याचे वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितले.





