Best News Portal Development Company In India

जागतिक पातळीवर रोटरी हीच एकमेव निस्वार्थी सेवाभावी संस्था…शरण पाटील !

जागतिक पातळीवर रोटरी हीच एकमेव निस्वार्थी सेवाभावी संस्था…शरण पाटील !

रोटरी क्लब मुरूम सिटी चा पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

ज्या संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती केवळ आर्थिक मदत करत नाही, तर स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम करून सेवाभावी वृत्तीने जगते आणि इतरांनाही जगण्याची नवी उमेद देते, ती म्हणजे रोटरी. खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर निस्वार्थपणे काम करणारी रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था आहे, असे प्रतिपादन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी केले.
​मुरूम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १८) आयोजित रोटरी क्लब मुरूम सिटी चा पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते शरण पाटील होते. यावेळी ​पदग्रहण अधिकारी तथा सहाय्यक प्रांतपाल दिनेश पटेल, टीआरएफ चे रवींद्र बनकर, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा, माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, रोटरीचे नूतन अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिनेश पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. अशा काळात रोटरीसारख्या संस्थेत काम करणे म्हणजे स्वतःला समृद्ध करण्यासारखे आहे. रोटरी केवळ प्रकल्प राबवत नाही, तर ती माणसाला माणसात आणण्याचे आणि तुटलेले ऋणानुबंध पुन्हा जोडण्याचे पवित्र काम करते. येथे काम करताना मिळणारे समाधान हे कोणत्याही पदकापेक्षा मोठे असते. शेवटी त्यांनी रोटरीचे प्रांतपाल यांचा शुभ संदेश वाचून दाखवला.

रवींद्र बनकर यांनी जीवनाचा सार व्यक्त करताना म्हणाले, लोक अनेकदा दु:ख संपल्यावर आनंदी होऊ, असे स्वप्न पाहतात. परंतु, वास्तविकता अशी आहे की, तुम्ही आनंदी राहिलात की दु:ख आपोआप कमी होते. समाधानी वृत्ती ही माणसाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवते. माणसाला जर खऱ्या अर्थाने सुख आणि शांती हवी असेल, तर त्यांनी पराकोटीची निस्वार्थ वृत्ती जोपासली पाहिजे. रोटरीचे कार्य हे त्याच निस्वार्थ वृत्तीचे प्रतीक आहे.

मावळते अध्यक्ष सूर्यवंशी यांनी सन २०२५-२६ या वर्षात रोटरीकडून राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकला. गेल्या वर्षभरात समाजाच्या विविध स्तरांतील घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही अनेक विधायक उपक्रम हाती घेतले. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि समाजाचा मिळालेला प्रतिसाद यामुळे हे उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाले.

​यावेळी नूतन अध्यक्ष स्वामी यांनी पुढील वर्षाच्या ध्येयधोरणांचे स्पष्टीकरणासह सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या सामाजिक उपक्रमांचे नियोजित आराखडे सर्वांसमोर ठेवले. मावळत्या अध्यक्षांनी घालून दिलेली ही परंपरा आम्ही अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणार आहोत. चालू वर्षात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत विशेष सामाजिक उपक्रम राबवण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याची भावना व्यक्त केली.
कॉर्नर स्टील सेंटर, मुरूम यांच्या सौजन्याने आणि रोटरीचे सदस्य शरणप्पा धुम्मा यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, कन्या प्रशाला आणि केंद्रीय प्राथमिक शाळेतील होतकरू गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनींना टिफिन बॅग, स्टीलच्या पाणी बॉटल व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच, कॉर्नर स्टीलचे प्रोप्रा. आकाश जगदाळे यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात रोटरीचे नूतन सदस्य बसवराज पाटील कोथळीकर, प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, ॲड. अमर पवार, राजकुमार नाईक, त्र्यंबक व्हटकर यांना रोटरीची पिन लावून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश मोटे तर आभार प्रदर्शन नूतन सचिव प्रकाश रोडगे यांनी मानले.
गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. कमलाकर मोटे, डॉ. महेश स्वामी, शिवशरण वरनाळे, आप्पासाहेब पाटील, उल्हास घुरघुरे, संतोष कांबळे, डॉ. महेश जिरोळे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. भूषण पाताळे, मल्लिकार्जुन बदोले, ॲड. उदय वैद्य, शिवकुमार स्वामी, बबन बनसोडे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरिक, रोटरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​फोटो ओळ : मुरूम येथील पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नूतन अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करताना शरण पाटील, दिनेश पटेल, रवींद्र बनकर, चंद्रशेखर मुदकण्णा व अन्य.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india