Best News Portal Development Company In India

शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर पक्षचिन्ह; ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनची चौकशीची मागणी!

*शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर पक्षचिन्ह; ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनची चौकशीची मागणी*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची प्रथम जयंती यनिमित्त राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” राबवले जात आहे.

उमरगा येथे आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महाआरोग्य शिबिर” या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ छापण्यात आल्याच्या प्रकरणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी, उमरगा यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित बॅनरवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा आरोग्य विभाग, महसूल विभाग आदी शासकीय विभागांचा स्पष्ट उल्लेख असूनही त्याचबरोबर एका राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम शासकीय आहे की राजकीय, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या नावाने राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रसिद्धीत कोणत्याही पक्षाची ओळख किंवा प्रचारात्मक बाबींचा समावेश होणे लोकशाही व्यवस्थेस व प्रशासकीय तटस्थतेस बाधक असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे.

या प्रकरणी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करणे, संबंधित बॅनर कोणाच्या परवानगीने छापण्यात आला याची चौकशी करणे, नियमभंग आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणे तसेच भविष्यात शासकीय कार्यक्रमांच्या प्रसिद्धीत कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह किंवा प्रचारात्मक बाबींचा समावेश होणार नाही, याबाबत सर्व संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे. निवेदनासोबत संबंधित बॅनरचे छायाचित्रही प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.
निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, करिम शेख, किशोर बसगुंडे, कविता साळी, ऍड. अर्चना जाधव, ऍड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, राजू बटगिरे, प्रदीप चौधरी, प्रदीप मोरे, बबीता मदने, संतोष चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india