उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिराचे आयोजन
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदीसह सर्वच रोगांची मोफत तपासणी, औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच महारक्तदान शिबीर व दिव्यांग तपासणी करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग, उमरगा व लोहारा तालुका महसूल विभाग व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे बुधवारी (दि.२२) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील जनतेच्या सक्षम आरोग्य सेवेसाठी या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोफत तपासणी, औषधोपचारासह शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, संयोजक शरण पाटील, नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंसच्या सभापती ॲड आकांक्षा चौगुले, लोहारा नगराध्यक्ष वैशाली खराडे, सभापती पल्लवी जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महाआरोग्य शिबिरात लातुर, सोलापूर व धाराशिवसह उमरगा शहरातील विविध आजारांवरील तज्ञ व नामवंत डॉक्टरकडून कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदीसह विविध आजारांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात येणार आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाण पत्राची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महसुल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





