तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा ऐतिहासिक निर्णय: आता बाळाच्या डिस्चार्जसोबतच मिळणार जन्मदाखला!
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर शहरातील आणि आसपासच्या खेडेगावातील रुग्णांची होणारी गैरसोय टळली.उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे जन्मलेल्या बालकांच्या जन्मदाखल्यासाठी (Birth Certificate) आता पालकांना महिनोन्-महिने ताटकळत राहावे लागणार नाही. रुग्णालयातून सुट्टी (Discharge) मिळतानाच बाळाचा अधिकृत जन्मदाखला हातामध्ये देण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ आज, २३ जुलै रोजी करण्यात आला.
यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळांचा दाखला मिळण्यासाठी पालकांना तब्बल महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागत असे. त्यासाठी रुग्णालयात आणि शासकीय कार्यालयांत वारंवार फेऱ्या माराव्या लागत असत. यामुळे नवजात बालकांच्या पालकांना नाहक मानसिक व शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
नागरिकांची हीच अडचण ओळखून वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले सर आणि रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री. आनंद (दादा) कंदले यांच्या संकल्पनेतून डिस्चार्जसोबतच जन्मदाखला देण्याचा हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतीमान आणि पारदर्शक करून थेट रुग्णाच्या हातात दाखला सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बाळाच्या जन्मानंतर पालकांची होणारी धावपळ थांबवणे आणि त्यांना एकाच छताखाली जलद सेवा देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. आजपासून या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली असून पालकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
या निर्णयाचे प्रमुख फायदे:-
वेळेची बचत: दाखल्यासाठी रुग्णालयात पुन्हा फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
नियोजनबद्ध सेवा: बाळ आणि आई घरी जातानाच सर्व कागदपत्रे पूर्ण मिळतील.
पारदर्शकता: शासकीय सेवा अधिक गतिमान आणि रुग्णस्नेही (Patient-friendly) होण्यास मदत.
रुग्णालय प्रशासनाच्या या लोकाभिमुख आणि कौतुकास्पद निर्णयामुळे तुळजापूर व परिसरातील नागरिकांमधून डॉ. दीपक चोरमले व आनंद (दादा) कंदले यांच्यासह संपूर्ण रुग्णालय टीमचे आभार मानले जात आहेत.






