Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामांच्या अनुषंगाने विशेष मंत्रपठण विधी संपन्न!

 

श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामांच्या अनुषंगाने विशेष मंत्रपठण विधी संपन्न!
तुळजापूर प्रतिनिधी;- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभावे तसेच ही सर्व कामे निर्विघ्न, सुरळीत व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आज श्री तुळजाभवानी मंदिरात विशेष मंत्रपठण विधी संपन्न झाला. यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायण हे धार्मिक विधी संपन्न झाले.
आज सकाळी सकाळी ७ ते ८ या वेळेत उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या अभिषेकासाठी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो हे यजमान म्हणून सपत्नीक उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत भवानी-शंकर मंदिरात रुद्राभिषेक संपन्न झाला, त्यासाठी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे हे यजमान म्हणून सपत्नीक उपस्थित होते.
तसेच श्री तुळजाभवानी देवींच्या अभिषेक व संकल्प विधीसाठी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम हे यजमान म्हणून सपत्नीक उपस्थित होते.
श्री देवींचे मळवट चोपल्यानंतर तिन्ही यजमानांनी श्री तुळजाभवानी देवींची महाआरती केली. त्यानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर श्री गणेश विहार येथे उपस्थित ब्राह्मणवृंदांना विधीवत वर्णी देण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामे सुरळीत, निर्विघ्न व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत याकरिता परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महासन्निधानम्, शृंगेरी शारदा पीठ यांचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यांनी सुचविलेल्या धार्मिक विधी बाबत विश्वस्त मंडळ, प्रशासन, महंत व तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष या सर्वांच्या विचारविनिमयानंतर वरील प्रमाणे कार्यवाही पार पाडली. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), धार्मिक व्यवस्थापक, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, सरकारी उपाध्ये सुनीत पाठक, मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच भाविक आणि पुजारी बांधव उपस्थित होते.
तसेच आज पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे गुरूपौर्णिमेनिमित्त महंत तुकोजीबुवा व महंत चिलोजीबुवा यांचा मंदिर संस्थानच्या वतीने आहेर देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india