अपसिंगा येथे शेतकऱ्याच्या शेतातून म्हैस आणि रेडी चोरी; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील एका महिलेची म्हैस आणि तिची रेडी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या या जनावरांची चोरी झाली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगिता अर्जुन क्षिरसागर (वय ३६ वर्षे, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी अपसिंगा शिवारात श्रीराम उर्फ सचिन गुलाबराव जाधव यांचे शेत बटईने (कसायला) घेतले आहे. शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेपासून ते रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोराने शेतात बांधलेली ६५,००० रुपये किमतीची एक म्हैस आणि तिची रेडी चोरून नेली.
सकाळी शेतात गेल्यानंतर जनावरे गायब असल्याचे लक्षात आल्याने संगिता क्षिरसागर यांनी परिसरात शोध घेतला; परंतु जनावरांचा काहीच पत्ता लागला नाही.
या प्रकरणी फिर्यादी संगिता क्षिरसागर यांनी रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






