न्यायाच्या प्रतीक्षेत वृद्ध पावले महाद्वारात! तुळजाभवानी अभियांत्रिकीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह साखळी उपोषण.
सातवा वेतन आयोग, थकबाकी आणि पदोन्नतीच्या फरकासाठी आंदोलनाचा एल्गार; लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांचा पाठिंबा
तुळजापूर प्रतिनिधी:- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवारपासून तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वार परिसरात कुटुंबासह साखळी उपोषण सुरू केले आहे. आयुष्याची उरलेली वर्षे सन्मानाने जगण्यासाठी हक्काच्या थकीत रकमेकरिता वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून उपोषण करण्याची वेळ आल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?
आंदोलक कर्मचाऱ्यांनी मंदिर प्रशासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत:
सातवा वेतन आयोग: शासकीय निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करून सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतची फरकाची थकीत रक्कम त्वरित अदा करावी.
ग्रॅच्युटी व रजा रोखीकरण: सातव्या वेतन आयोगानुसार सेवा उपदान (Gratuity) आणि रजा रोखीकरणाची (Leave Encashment) फरकाची रक्कम मंजूर करावी.
कालबद्ध पदोन्नती फरक: शासन निर्णयाप्रमाणे १२ व २४ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नती योजनेनुसार मिळणारी फरकाची रक्कम थकबाकीदारांना मिळावी.
या साखळी उपोषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही हिरिरीने भाग घेतला आहे. उपोषणात विलास भोसले, दत्ता जाधव, नंदू पाटील, चंद्रकांत ओवरीकर, विलास चाटूफुळे, गंगाधर मेथेकर, रवी दुरूगकर, अशोक रोचकरी, नागनाथ जाधव, महादेव देशमुख, अनिल कुलकर्णी, अनिल डोंगरे, गोविंद खुरुद, विठ्ठल ढवळे यांच्यासह मंजुषा चाटुफुळे, छाया जाधव, अर्चना दुरुगकर, कल्पना मेथेकर आदी कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
विविध संघटना व लोकप्रतिनिधींची उपोषणस्थळी धाव
कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नगरसेवक, राजकीय नेते व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाद्वारातील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली व त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.
”अनेक वर्षे महाविद्यालयात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी उपोषण करावे लागणे दुर्दैवी आहे. मंदिर प्रशासनाने तातडीने या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.”
श्रीनाथ शिंदे (अध्यक्ष, व्यापारी संघटना)
उपोषणस्थळाला भेट देऊन पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गटनेते औदुंबर कदम, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, नगरसेवक चंद्रशेखर भोसले, दिनेश क्षिरसागर, नरेश अमृतराव, रत्नदीप भोसले, माजी नगरसेवक सज्जनराव साळुंखे, विजय कंदले आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनाथ शिंदे या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता.
आता मंदिर प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना कधी न्याय देते, याकडे संपूर्ण तुळजापूर शहराचे लक्ष लागले आहे.








