स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: धाराशिवमध्ये लाखो रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त, दोघे जेरबंद!
तुळजापूर प्रतिनिधी;-पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब लगत पाझर तलावाजवळ कारवाई; २९ पुड्यांमध्ये ११.२१ ग्रॅम ड्रग्ज हस्तगत.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अत्यंत घातक अमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती समोर येत होती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) याविरोधात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब शहरालगत बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या दोन तरुणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार हे आपल्या स्टाफसह कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, निखिल जाधव आणि अरविंद कांबळे हे दोघे कळंब-येरमाळा रोडवर पाझर तलावाजवळ अमली पदार्थ घेऊन येणार आहेत.
माहिती मिळताच एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करत पंच, फॉरेन्सिक व्हॅन आणि पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाड टाकण्यात आली. रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून संशयास्पद स्थितीत उभे असलेल्या या दोन्ही इसमांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
२९ पुड्यांमध्ये ११.२१ ग्रॅम ड्रग्ज जप्त
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत दोन्ही संशयितांच्या ताब्यात ११.२१ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची स्फटिक स्वरूपातील २९ पारदर्शक प्लास्टिक पुड्या (एमडी ड्रग्ज) मिळून आल्या. या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर क्र. ३२६/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क) आणि २२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
”अमली पदार्थांच्या माध्यमातून तरुण पिढीची राखरांगोळी करणाऱ्यांवर धाराशिव पोलिसांची करडी नजर आहे. असा बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” > — पोलीस प्रशासन, धाराशिव
या पथकाने केली धडक कारवाई
सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि पोलीस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके, कळंब पो.स्टे.चे सपोनि मगर, तसेच पोलीस अंमलदार राठोड, जानराव, गादेकर, जाधवर, चौरे, ढगारे, मुंगळे, शेख, माळवे, बोईनवाड, आरब आणि माने यांनी सहभाग नोंदवला.
पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.






