उमरगा आगाराची बस पुन्हा एकदा फेल; प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांचा संताप
महिनाभरात तिसऱ्यांदा घटना; कंटेकूर येथे गिअर बॉक्स बिघाडामुळे बस बंद
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव
उमरगा आगाराच्या बससेवेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, बस क्रमांक MH20BL4229 या बसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. उमरगा–कंटेकूर–मुरूम मार्गावरील टसकाळी ८ वाजताची बस कंटेकूर येथे गिअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक बंद पडली.
बस बंद पडताच प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कामानिमित्त, शाळा, महाविद्यालय तसेच विविध कार्यालयांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ रस्त्यावर थांबावे लागले. विशेष म्हणजे, याच मार्गावरील बससेवेत महिनाभरात तिसऱ्यांदा बिघाड झाल्याने उमरगा आगाराच्या देखभाल व नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांनी आगार प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाला आळा घालून बसची नियमित तपासणी करावी, सुस्थितीतील बसेस मार्गावर सोडाव्यात आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
उमरगा आगाराने वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांची गंभीर दखल घेऊन बससेवा अधिक सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.






