केमवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; कामांच्या चौकशीची ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी
अंडरग्राउंड ड्रेनेज निकृष्ट दर्जाचे; आर.ओ. वॉटर प्लांटच्या निधीचा गैरवापर आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!
तुळजापूर (विशेष प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील केमवाडी ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामपंचायत सदस्य केशव अशोक पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट तुळजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.
अर्जातील प्रमुख मुद्दे व गंभीर आरोप:
निकृष्ट दर्जाची कामे: १५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीत सुरू असलेली कामे, विशेषतः अंदरग्राउंड ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकांकडे माहिती व कागदपत्रांची मागणी केली असता, ते टाळाटाळ करून उत्तरे देत आहेत.
आर.ओ. वॉटर प्लांटच्या उत्पन्नाचा गैरवापर: गावातील RO Water Plant चे योग्य नियोजन न करता, त्यातून मिळणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न अधिकृत खात्यावर जमा न करता परस्पर वैयक्तिक कामासाठी वापरून निधीचा गैरव्यवहार केला जात आहे.
आरोग्याशी खेळ; थेट तळ्यातील अशुद्ध पाणीपुरवठा: पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मिळालेल्या ब्लिचिंग पावडरचा (Bleaching Powder) वापर न करता, ग्रामस्थांना थेट तळ्यातील अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे संपूर्ण गावच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
बिल न काढण्याची अन् आंदोलनाची चेतावणी
”या सर्व प्रकारांची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. सर्व तक्रारींचे निरसन होईपर्यंत ग्रामपंचायतीचे कोणतेही बिल मंजूर करून काढू नये. प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.” > — केशव पाटील (तक्रारदार तथा ग्रामपंचायत सदस्य, केमवाडी)
प्रशासनाने या गंभीर तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता केमवाडीतील ग्रामस्थांमधूनही जोर धरू लागली आहे.







