Best News Portal Development Company In India

जनहित संघटनेच्या सलग १५ दिवसांच्या साखळी उपोषणाला यश; मंदिर प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय, उपोषण स्थगित!

जनहित संघटनेच्या सलग १५ दिवसांच्या साखळी उपोषणाला यश; मंदिर प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय, उपोषण स्थगित!
तुळजापूर प्रतिनिधी :- जनहित संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानशी संबंधित विविध स्थानिक समस्या व भाविकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या सलग १५ दिवसांच्या साखळी उपोषणाची अखेर सांगता झाली आहे. मंदिर प्रशासनाने जनहित संघटनेच्या मागण्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या स्वाक्षरीने जनहित संघटनेचे संस्थापक अजय (भैय्या) ज्ञानेश्वर साळुंके यांना या संदर्भातील अधिकृत पत्र (जा.क्र. २०२६/श्रीतुलुमसंस्तु/आस्था./१४९१, दिनांक ०४/०८/२०२६) प्रदान करण्यात आले. आज मंदिर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जागर घालून उपोषणाची यशस्वी सांगता केली.
मंदिर प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केलेले प्रमुख मुद्दे:
रुग्णवाहिका सुविधा (Ambulance Service): मंदिर संस्थानकरिता भारत विकास ग्रुप प्रा. लि. पुणे यांच्याकडून नवी रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्याची कारवाई सुरू आहे. तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथून आपत्कालीन स्थितीत तात्काळ रुग्णवाहिका मागवण्याची सोय करण्यात आली असून, महाद्वारासमोर संस्थानची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येत आहे.
स्थानिकांसाठी दर्शन सुविधा (Aadhaar Card Entry): पूर्वपार परंपरेनुसार सण-उत्सवाच्या दिवशी स्थानिकांना सकाळी ५ ते ६ या वेळेत दर्शनासाठी सोडले जाते. आता स्थानिकांना सकाळसह सायंकाळीही दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येत आहे.
समान दर्शन व्यवस्था (Equal Darshan Facility): विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार सर्व देवीभक्तांना एकाच रांगेतून समान दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
पारदर्शक कारवाई (Action on Temple Staff/Pujaris): मंदिर परिसरात गैरवर्तन करणाऱ्यांवर हुकूमशाही पद्धतीने कारवाई न करता, प्रथम ‘कारण दाखवा नोटीस’ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच पुढील कारवाई केली जात आहे.
विकास आराखडा व ग्रामस्थ/पुजाऱ्यांना विश्वासात घेणे: मंदिर विकास प्राधिकरणाचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी स्थानिक व पुजाऱ्यांना सादरीकरण करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शासकीय नियमांनुसारच सर्व कामे केली जात आहेत.
ब्रह्मदेव व उपदेवतांची पुनर्स्थापना: तीन्ही पुजारी मंडळ व महांतांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ब्रह्मदेव व उपदेवतांची विधीवत प्रतिष्ठापना करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे.
पेड़ दर्शन बंद करणे (Paid Darshan Issue): तुळजापूर नगरीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांसाठी ‘पेड दर्शन’ बंद करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
राजे शहाजी महाद्वार प्रवेश व पास सुविधा: भाविकांची गर्दी कमी असताना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश दिला जातो. गर्दीच्या वेळी संवर्धन कामात अडथळा येऊ नये म्हणून राजे शिवाजी दरवाजातून दर्शन व खेटा पूर्ण करण्याची सोय केली आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांसाठी डोली (खुर्ची) व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.
उपोषणाची सांगता: > मंदिर प्रशासनाने दिलेले लेखी पत्र व बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर जनहित संघटनेने आपले साखळी उपोषण स्थगित केले असून, यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india