परंडा पोलिसांची धडक कारवाई: सिना नदीच्या पात्रात मॅगझिनसह देशी बनावटीचे पिस्तूल जप्त; ३ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोत्रा शिवार येथील सिना नदीच्या पात्रात बेकायदेशीररीत्या मॅगझिनसह अग्निशास्त्र (पिस्तूल) बाळगणाऱ्या तीन विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकांना परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे हे शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजण्याच्या सुमारास भोत्रा शिवार येथील सिना नदीच्या पात्रात काही संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परंडा पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत ३ अल्पवयीन बालकांकडून २०,००० रुपये किमतीचे लोखंडी धातूचे मॅगझिनसह अग्निशास्त्र (पिस्तूल) विनापरवाना व बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तत्काळ हे शस्त्र जप्त केले.
शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
लोकांच्या जीवितास आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन प्रकाश गुंडाळे यांनी दिलेल्या प्रथम खबर (FİR) वरून परंडा पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलांच्या हाती अग्निशास्त्र आले कुठून, याचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






