तुळजाभवानी सैनिक विद्यालयात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी टी. टी. लसीकरण मोहीम यशस्वी!
तुळजापूर प्रतिनिधी :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टी. टी. (Tetanus Toxoid) लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या लसीकरण मोहिमेत इयत्ता १० वीचे विद्यार्थी, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, मेस विभागातील कर्मचारी तसेच बी. व्ही. जी. (BVG) यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांना टी. टी. चे इंजेक्शन देण्यात आले.
तज्ज्ञ टीमकडून मार्गदर्शन आणि लसीकरण
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या नर्सिंग सुपरवायझर काकडे मॅडम व त्यांच्या चमूने उपस्थित सर्वांना सुरक्षितपणे टी. टी. चे इंजेक्शन दिले. लसीकरणानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, काय पथ्ये पाळावीत आणि वैद्यकीयदृष्ट्या लसीचे काय महत्त्व आहे, याविषयी काकडे मॅडम यांनी अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली.
”आरोग्य हीच खरी संपत्ती असून अशा प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण होते. विद्यार्थ्यांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.” — डॉ. घोडके सर (प्राचार्य, तुळजाभवानी सैनिक विद्यालय)
सुयोग्य नियोजन व सांगता
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोडके सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम पार पडला. त्यांनी उपस्थितांना टी. टी. इंजेक्शनचे फायदे आणि आरोग्याची निगा राखण्याबाबत मोलाचा सल्ला दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन व समन्वयाची जबाबदारी विद्यालयाचे नर्सिंग असिस्टंट काशीद सर यांनी अत्यंत उत्तमरीत्या पार पाडली. सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.






