कळंब पोलिसांचा अवैध जुगारावर सर्जिकल स्ट्राईक! तहसीलदारांच्या बाबा दर्गाजवळील अड्ड्यावर छापा; ६ जण ताब्यात, रोख रकमेसह साहित्य जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:- कळंब शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, गुप्त बातमीदाराच्या खबरीवरून तहसीलदारांच्या बाबा दर्गा परिसरातील एका बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ जणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.
सायंकाळी ७ वाजता अचानक टाकला छापा!
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, ०९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे १९:०० वाजेच्या सुमारास कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख आणि त्यांच्या पथकाने पंचांसह तहसीलदारांच्या बाबा दर्गाजवळील प्रशांत जाधव यांच्या मालकीच्या बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये अचानक छापा टाकला. या अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगार चालवणाऱ्यांची व खेळणाऱ्यांची भंबेरी उडाली.
२२ हजार रुपयांची रोकड अन् साहित्य जप्त
पोलीस पथकाने घटनास्थळावरून ०६ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २२,०७० रुपये रोख आणि ‘तिर्रट’ नावाच्या जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे कळंब शहरातील अवैध जुगार चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई > ही धडक आणि यशस्वी कामगिरी धाराशिवच्या मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी पोलीस पथक:
पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकात सह. पोलीस निरीक्षक बजबळकर, पोउपनि पठाण, पोहेकॉ/९५२ राहिंज, पोना/१४६५ पोळ, पोकॉ/८३२ खाडे, पोकॉ/१८१४ अशमोड आणि पोकॉ/१८३२ माळी यांचा समावेश होता.
कळंब पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात असून, शहरातील इतर अवैध धंद्यांवरही अशीच कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






