धक्कादायक! तुळजापुरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तालुक्यातील एका गावात १६ वर्षे ६ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ किंवा १६ जुलैच्या मध्यरात्री १.०० ते १.३० वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाने “माझे तुझ्याकडे काम आहे” असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. मुलगी तेथे गेली असता, संशयिताने पीडितेला व तिच्या आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचे छायाचित्रीकरण (फोटो/व्हिडिओ) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सातत्याने त्रास दिला.
आरोपीच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित मुलीने अखेर धाडस दाखवत ९ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या प्रथम खबर अहवालावरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६५(१), ७८, ३५१(२), आणि ३५१(३)
पोक्सो कायदा (POCSO Act 2012): कलम ४ आणि १२ (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण)
अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून तुळजापूर पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत. पीडितेचे वय अल्पवयीन असल्याने तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.






