तुळजापूर नगरपालिकेच्या अधिकारांवर गदा आणल्यास तीव्र विरोध ; विकासकामे (PWD) देण्यास पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध!
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर शहर नगरपालिकेच्या हद्दीतील विकासकामे ही नगरपालिकेच्याच माध्यमातून करण्यात यावीत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) वर्ग करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा तुळजापूर नगरपरिषदेचे गटनेते औदुंबर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित , गटनेते औदुंबर कदम, व उपनगराध्यक्ष रामचंद्र (आबा)रोचकरी ,पाणीपुरवठा सभापती सागर कदम, नगरसेवक लखन पेंदे, रत्नदीप भोसले, विजय कंदले, माऊली भोसले आणि मधुकर शेळके यांनी नगरपरिषदेची अधिकृत भूमिका मांडली.
प्रमुख मुद्दे व मागण्या-
नगरपालिकेची सक्षमता: नगरपरिषदेकडे आवश्यक यंत्रणा, पुरेसा अनुभव आणि पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे नगरपरिषद सक्षमपणे पूर्ण करू शकते, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
४५ विकासकामांचे नियोजन:- शहरात प्रभाग क्रमांक १ ते ११ दरम्यान सुमारे ४५ विकासकामे नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी बाहेरील विभागाची आवश्यकता नाही.
स्वायत्ततेवर गदा:- नगरपालिकेवर अविश्वास दाखवून कामे दुसऱ्या विभागाकडे सोपवणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
विशेष ठराव मंजूर:- नगरपरिषदेला मिळणारा विकासनिधी नगरपालिकेमार्फतच खर्च केला जावा, असा अधिकृत ठराव नगरपरिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
“नगरपालिकेच्या कामांचा निधी आणि अधिकार नगरपालिकेकडेच राहिले पाहिजेत. प्रशासनाने ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केल्यास नगरपरिषदेच्या वतीने तीव्र विरोध केला जाईल.”. औदुंबर कदम (गटनेते).







