धाराशिव जि. प. सदस्या सौ. सिमाताई माडजे आक्रमक: आरोग्य, शिक्षण अन् रस्त्यांच्या प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले विविध निवेदने!
मंगरूळ गटातील विकासकामे, सेमी इंग्रजी धोरणाचा फेरविचार, शिक्षकांचे प्रश्न आणि आरोग्य सुविधा तातडीने पुरवण्याची जोरदार मागणी
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्हा परिषदेच्या मंगरूळ गटातील विविध नागरी समस्या, आरोग्य सुविधा, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना भेटून विविध मागण्यांची निवेदने सादर केली आहेत.
प्रमुख मागण्या व मुद्दे:
१. आरोग्य यंत्रणेत सुधारणा व ‘आरळी बु.’ येथे PHC मंजूर करा!
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC): मौजे आरळी बु. (ता. तुळजापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करण्याची मागणी सौ. माडजे यांनी केली.
आरोग्य चाचण्या पुन्हा सुरू करा: मंगरूळ PHC मध्ये बंद करण्यात आलेल्या HbA1c, Vitamin B-12 व Vitamin D-3 या महत्त्वाच्या रक्तचाचण्या तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात.
उपकेंद्रांची दुरुस्ती व स्वच्छतागृह: मंगरूळ PHC सह चिंचोली, आरळी बु., कुंभारी, तीर्थ खुर्द, ढेकरी, बोरी या उपकेंद्रांची व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची (Staff Quarters) दुरुस्ती करून नवीन टॉयलेटची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
२. सेमी इंग्रजी अभ्यासाबाबत धोरणात्मक फेरविचाराची मागणी
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये अचानक १ ली ते ५ वी साठी लागू करण्यात आलेल्या सेमी इंग्रजी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
शिक्षक प्रशिक्षण व समिती: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी शिक्षकांना सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे तज्ज्ञ शिक्षक, डाएटचे प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करून नियोजनबद्ध पद्धतीने सेमी इंग्रजी लागू करावी, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला.
३. शिक्षक संघटनांच्या मागण्या अन् उपोषणाचा इशारा!
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ‘धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती’ने दिलेल्या इशारा पत्राची दखल घेत सौ. माडजे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या मांडल्या:
पदोन्नती प्रक्रिया रद्दीकरण: शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नतीमधील अनियमितता दूर करून सेवाज्येष्ठता यादीनुसार नवीन पारदर्शक पदोन्नती प्रक्रिया राबवावी.
शिक्षकांचे प्रश्न: निवडश्रेणी, जुनी पेन्शन योजना (नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींमधील पात्र शिक्षकांसाठी), भाषा व गणित/विज्ञान पदवीधर पदे भरणे, कोरोना काळातील जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, आणि १ कोटींपेक्षा जास्त जमा निधीचा पारदर्शक विनियोग या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.
४. रस्ते दुरुस्ती व विकासकामांसाठी निधीची मागणी
मंगरूळ जि. प. गटातील विविध रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी डीपीडीसी (DPDC) व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून अंदाजपत्रक (Estimates) तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे:
प्रमुख रस्ते कामांचे प्रस्ताव:
काळगाव पाटी ते काळगाव सिमेंट रस्ता
मंगरूळ ते धनेगाव रस्ता
मंगरूळ ते खंडाळकरवाडी रस्ता
आरळी खु. ते आरळी बु. रस्ता
कसई ते काळगाव रस्ता
रायखेल ते कुंभारी डांबरी रस्ता (सुमारे ५० लक्ष)
बिजनवाडी ते देवासिंगा रस्ता (सुमारे ५० लक्ष)
तीर्थ खु. ते सरडेवाडी/खोताचीवाडी रस्ता (सुमारे ५० लक्ष)
तीर्थ बु. येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम (१० लक्ष)
”मंगरूळ गटातील नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि ग्रामीण भागातील रस्ते या माझ्या प्राथमिक गरजा आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.” — सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे (जि. प. सदस्या, धाराशिव)









