*अध्यापन व सेवाकार्यातील योगदानाचा गौरव; श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील चौघांचा पुरस्काराने सन्मान*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. १७ ऑगस्ट : भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी दरवर्षी महाविद्यालयातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा चार विभागांतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्याच्या आधारे निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान केला जातो.
यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजित आष्टे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. संजय बारबोले यांची निवड करण्यात आली. संशोधन, उत्कृष्ट अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी कार्यालयीन कर्मचारी श्री. मताजी पवार आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. विनायक जाधव यांची निवड करण्यात आली. संस्थेप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिक सेवा, जबाबदारीची जाणीव आणि महाविद्यालयाच्या कार्यात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. एच आर ही आदर्श कर्मचाऱ्यांचा भर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अमोल मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. एवढी भारत शिक्षण संस्थेचे चिटणीस मा. पद्माकरराव हरळकर, संचालक मा . सुरेशदाजी बिराजदार, मा. डॉ. सुभाषराव वाघमोडे, मा. सुनील माने आणि मा. दिगंबरराव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची महाविद्यालयाची ही परंपरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा देणारी ठरत आहे.
पुरस्कार प्राप्त चारही कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








